हसनाबाद पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आयशर ट्रक आणि लोखंडी सळई चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मालापैकी ८ लाख ५९ हजार १६३ रुपये किमतीच्या लोखंडी सळई हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १:३० वाजेच्या सुमारास हसनाबाद येथील 'गुरुमाऊली ट्रेडर्स' या दुकानासमोरून लोखंडी सळईने भरलेला आयशर ट्रक अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी फिर्यादी स्वप्नील सत्यनारायण राठी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७४/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीला गेलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत १६ लाख ५९ हजार १६३ रुपये इतकी होती.
असा लागला छडा
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जाळे विणले. गुप्त बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली. तपासादरम्यान दोन मुख्य आरोपी निष्पन्न झाले:
१) ताबेश रफिक शेख (वय २० वर्षे, रा. मदीडा मस्जिद, हुडको कॉलनी, चाळीसगाव, जि. जळगाव)
२) समीर रज्जाक शेख (वय ३२ वर्षे, रा. वडोद बाजार, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर)
पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ८ लाख ५९ हजार १६३ रुपयांच्या लोखंडी सळई जप्त करण्यात आल्या आहेत.
ही यशस्वी कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
हसनाबाद पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश उबाळे, पोउपनि सखाहरी तायडे, पोलीस कर्मचारी दुर्गेश राठोड, निलेश खरात, प्रकाश बोर्डे, दिपक सोनुने, नारायण चरावंडे, अविनाश मान्टे, राहुल भागीले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रशांत लोखंडे, धिरज भोसले आणि तांत्रिक विश्लेषणाचे सागर वावस्कर यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
पुढील तपास हसनाबाद पोलीस करत आहेत.


0 टिप्पण्या