Ticker

6/recent/ticker-posts

माणुसकीचे दर्शन! डिझेलसाठी रात्रभर मुक्काम करणाऱ्या बळीराजासाठी धावला 'कल्पतरू'; पेट्रोल पंपावरच रंगाली जेवणाची पंगत

 


राज भाले 

सध्या संपूर्ण जिल्ह्यात मान्सूनपूर्व शेतीच्या कामांची मोठी लगबग सुरू आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना डिझेलची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून टेंभुर्णी आणि परिसरात निर्माण झालेल्या तीव्र इंधन टंचाईमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. डिझेल मिळवण्यासाठी टेंभुर्णी-कुंभारझरी रस्त्यावरील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मैलोन्‌मैल लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

डिझेलसाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी

कुंभारझरी मार्गावरील 'कल्पतरू पेट्रोल पंपावर' डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह प्रचंड गर्दी केली होती. मात्र, मागणी तसा पुरवठा नसल्याने पंपावरील डिझेलचा साठा संपला. नवीन डिझेलचा टँकर मध्यरात्री उशिरा येणार असल्याचे समजताच, हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी डिझेल मिळण्याच्या आशेने उपाशीपोटी आपल्या ट्रॅक्टरसह पंपावरच रात्रभर मुक्काम ठोकण्याचा निर्णय घेतला.

...आणि पेट्रोल पंपावरच बसली जेवणाची पंगत!

तास न् तास रांगेत उभे राहून आणि उपाशीपोटी रात्रीचा मुक्काम ठोकणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल कल्पतरू पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाला पाहवले नाहीत. अशा कठीण प्रसंगी पेट्रोल पंप चालक संजय सावंत यांनी तात्काळ सामाजिक बांधिलकी जपत एक कौतुकास्पद पाऊल उचलले.

"शेतकरी आपला अन्नदाता आहे, तो आपल्या दारात उपाशी राहू नये" या भावनेतून संजय सावंत यांनी तातडीने व्यवस्था करत पंपाच्या आवारातच रात्रीच्या वेळी सर्व शेतकऱ्यांसाठी थेट जेवणाची पंगत बसवली.

शेतकऱ्यांनी देखील या संकट समयी मिळालेल्या मायेच्या घास बद्दल समाधान व्यक्त केले. कल्पतरू पेट्रोल पंप व्यवस्थापनाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे उपस्थित शेतकरी वर्ग भारावून गेला होता. शेतकऱ्यांनी पंप चालक संजय सावंत आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानले आहेत.

सध्या सोशल मीडियावर कल्पतरू पेट्रोल पंपावरील या 'शेतकरी जेवणाच्या पंगतीचे' फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून, त्यांच्या या दातृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या