गणेश पगारे
जाफराबाद तालुक्यात वाढत्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत अक्षरशः ‘सर्जिकल स्ट्राईक’ उभारला आहे. अवघ्या ४ ते ५ दिवसांत राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ७३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ९ ट्रॅक्टर आणि १ जेसीबी मशीन पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे तालुक्यातील वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवैध वाळू व मुरूम उत्खनन आणि वाहतुकीच्या घटना वाढत असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे नियोजनबद्ध पद्धतीने विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवायांमध्ये अचूक नियोजन आणि जलद कृती यांचा संगम साधत पोलिसांनी अवैध व्यवसायांवर मोठा आघात केला.
या मोहिमेत जप्त करण्यात आलेली ९ ट्रॅक्टर आणि १ जेसीबी मशीन ही प्रामुख्याने अवैध वाळू व मुरूम उत्खनन तसेच वाहतुकीसाठी वापरली जात होती. थेट वाहन जप्तीच्या कारवाईमुळे अवैध धंदा करणाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या कंबरड्यावरच घाव बसला आहे.
या संपूर्ण मोहिमेत पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव यांनी विशेष मेहनत घेत सक्रिय भूमिका बजावली. स्थानिक स्तरावर माहिती गोळा करणे, संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे आणि योग्य वेळी पथकाला माहिती पुरवणे यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या सहकार्यामुळे अनेक ठिकाणी अचूक छापे टाकण्यात पोलिसांना यश मिळाले.
या कारवाईनंतर तालुक्यात प्रशासनाचा धाक पुन्हा निर्माण झाला असून नागरिकांकडून पोलिसांच्या या धाडसी पावलाचे स्वागत केले जात आहे. अवैध उत्खनन आणि वाहतुकीमुळे होणारे पर्यावरणीय व आर्थिक नुकसान रोखण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
“जाफराबाद तालुक्यात सुरू असलेल्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीविरोधातील ही कारवाई ठोस संदेश देणारी आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल. कुणालाही बेकायदेशीर काम करण्याची मुभा दिली जाणार नाही. पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील,” असा इशारा पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी दिला.
कायदा सुव्यवस्था राखण्यास कटिबद्ध
“वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबवली. अवैध धंद्यांवर आळा बसावा आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा हा आमचा उद्देश आहे. पुढेही आम्ही सतर्क राहून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



0 टिप्पण्या