Ticker

6/recent/ticker-posts

Jalna Rain: जालन्यात अवकाळी पावसाचा हाहाकार; वीज पडून २ तरुणांचा मृत्यू

 


गणेश पगारे 

जालना: राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले असून, जालना जिल्ह्यातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील महाकाळा येथे अंगावर वीज कोसळून दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यात सोमवारी (३० मार्च) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी शेतातून घराकडे परतत असताना पावसाचा जोर वाढल्याने गोविंद प्रल्हाद लहाने (वय २१) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय २०) या दोन तरुणांनी सुरक्षिततेसाठी रस्त्याशेजारील एका लिंबाच्या झाडाचा आसरा घेतला.

मात्र, दुर्दैवाने त्याच झाडावर वीज कोसळली. या भीषण दुर्घटनेत गोविंद आणि आदित्य या दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला तिसरा तरुण या घटनेत गंभीर भाजला असून, त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गावावर शोककळा आणि प्रशासकीय धावपळ

घटनेची माहिती मिळताच महाकाळा गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ऐन उमेदीच्या दोन तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

शेतपिकांचेही मोठे नुकसान

जालना जिल्ह्यात झालेल्या या वादळी पावसामुळे केवळ जीवितहानीच नाही, तर जनजीवनही विस्कळीत झाले आहे. काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

प्रशासनाचे आवाहन: झाडाखाली थांबू नका!

हवामान विभागाने पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे:

पाऊस किंवा विजांचा कडकडाट सुरू असताना विरळ भागात किंवा झाडाखाली आश्रय घेऊ नका.

विजेच्या खांबांपासून आणि मोकळ्या मैदानांपासून दूर राहा.

पाऊस सुरू असताना मोबाईल फोनचा वापर टाळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या