जाफराबाद शहरात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एक थरारक आणि अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरासमोरून बुलेट दुचाकी चोरून पळणाऱ्या चोरांचा धाडसाने पाठलाग करणाऱ्या एका मिरची व्यापाऱ्याची चोरट्यांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. शेख मोहसीन शेख मजीद (वय ४६) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. या जीवघेण्या हल्ल्यात त्यांचा पुतण्या शेख साहिल (वय २२) हा देखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जाफराबाद शहरासह तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मध्यरात्री घडला थरार
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २७ मे २०२६ रोजी रात्री अंदाजे १ ते २ वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील सिद्धार्थ नगर, चिखली रोड परिसरातील घरासमोर उभी असलेली बुलेट दुचाकी काही चोरटे चोरून नेण्याचा प्रयत्न करत होते. गाडी चोरीला जात असल्याचे वाहन मालक शेख मोहसीन यांच्या लक्षात आले. त्यांनी कसलाही विचार न करता तात्काळ आपल्या पुतण्याला (शेख साहिल) सोबत घेतले आणि चोरांचा पाठलाग सुरू केला.
तब्बल ७ ठिकाणी केले सपासप वार
चोरट्यांचा पाठलाग करत असताना चिखली रोडवरील जंजाळवाडी परिसरात शेख मोहसीन यांनी चोरांना गाठले. मात्र, स्वतःला पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी स्वतःजवळील धारदार शस्त्राने शेख मोहसीन आणि शेख साहिल यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या भयंकर हल्ल्यात चोरट्यांनी शेख मोहसीन यांच्या डोक्यावर, मानेवर, पाठीवर आणि डाव्या दंडावर अशा तब्बल सात ठिकाणी सपासप वार केले.
हल्ल्यानंतर दोन्ही काका-पुतणे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनेची माहिती मिळताच गंभीर जखमी अवस्थेत शेख मोहसीन यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे नेत असताना, दुर्दैवाने वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. जखमी पुतण्या शेख साहिल शेख मोबिन याच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव या घटनेचा पुढील तपास करत असून फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
जाफराबाद तालुक्यात हळहळ
मयत शेख मोहसीन हे जाफराबाद येथील न्यू हायस्कूलमध्ये कार्यरत असलेले शिक्षक शेख मोबिन सर यांचे लहान बंधू होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेल्या शेख मोहसीन यांच्या अशा दुर्दैवी आणि अचानक जाण्याने संपूर्ण जाफराबाद शहरावर शोककळा पसरली असून, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.


0 टिप्पण्या