जिवलग मित्रानेच मित्राचा काटा काढल्याची धक्कादायक घटना जालना तालुक्यातील शिरसवाडी येथे घडली आहे. आईची छेड काढत असल्याच्या संशयावरून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने २५ वर्षीय तरुणाचा झोपेत असताना गळा चिरून निर्घृण खून केला. ही घटना शुक्रवारी (१० एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
निखिल वाघमारे (वय २५, रा. शिरसवाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. निखिल आणि आरोपी अल्पवयीन मुलगा हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. मात्र, निखिल आपल्या आईची छेड काढतो, असा संशय आरोपीच्या मनात होता. या रागातून त्याने निखिलच्या खुनाचा कट रचला. शुक्रवारी रात्री दोघांनी मिळून पार्टी केली. त्यानंतर निखिल गाढ झोपेत असताना आरोपीने संधी साधून धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात निखिलचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांची तत्पर कारवाई
घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गुन्हा करून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
गावात भीतीचे वातावरण
शनिवारी (११ एप्रिल) सकाळी निखिलचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दुपारी शोकाकुल वातावरणात शिरसवाडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिवलग मित्रानेच संशयापोटी इतके टोकाचे पाऊल उचलल्याने गावात भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी जालना तालुका पोलीस पुढील तपास करत असून, वाढत्या गुन्हेगारी मानसिकतेवर आता समाजात चर्चा सुरू झाली आहे.


0 टिप्पण्या