Ticker

6/recent/ticker-posts

Jalna Crime Thriller: वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचा राग; लग्नाच्याच दिवशी मुलाने कुऱ्हाडीने वार करून बापाला संपवलं


गणेश पगारे
जालना जिल्ह्यातून एक हृदयद्रावक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील रुई गावात वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे संतप्त झालेल्या १९ वर्षीय मुलाने आपल्याच वडिलांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे, ज्या दिवशी वडिलांचे दुसरे लग्न होणार होते, त्याच दिवशी मुलाने हा टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत दिलीप राजगुरू (वय ४५) हे पत्नीच्या निधनानंतर एकटेच होते. त्यांनी पुन्हा संसारात स्थिरस्थावर होण्यासाठी दुसऱ्या विवाहाचा निर्णय घेतला होता. आज, गुरुवारी त्यांचा विवाह संपन्न होणार होता. मात्र, वडिलांचा हा निर्णय त्यांचा मुलगा विलास राजगुरू (वय १९) याला मान्य नव्हता. आईच्या जागी दुसरी स्त्री येण्याच्या कल्पनेने विलासच्या मनात वडिलांविषयी प्रचंड राग होता.

रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास दिलीप राजगुरू यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घराजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तीर्थपुरी पोलीस ठाण्याला कळवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात मृतदेहावर कुऱ्हाडीने गंभीर वार केल्याचे दिसून आले, ज्यामुळे ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले.

मित्रासोबत मिळून रचला कट

पोलिसांनी संशयावरून मुलगा विलास याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. विलासने रागाच्या भरात पहाटेची संधी साधून वडिलांवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. ज्या दिवशी घरात सनई-चौघडे वाजणार होते, त्याच दिवशी वडिलांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिस कारवाई सुरू

या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात आरोपी विलास राजगुरू आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास तीर्थपुरी पोलिसांकडून केला जात आहे.
नात्यांमधील संवाद संपल्यामुळे आणि क्षणिक रागातून पोटच्या मुलाने वडिलांचे आयुष्य संपवल्याने या घटनेची जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या