Ticker

6/recent/ticker-posts

भोकरदनमध्ये महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला; एक मजूर ठार, चौघे जखमी


गणेश पगारे

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा रोडवरील राजकुवर महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामादरम्यान शुक्रवारी सायंकाळी भीषण दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅबचा काही भाग कोसळल्याने मलब्याखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला, तर चौघे मजूर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. त्यावेळी अनेक मजूर कामावर होते. स्लॅबचा मलबा कोसळल्याने काही मजूर त्याखाली अडकले. घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, बांधकामावरील इतर कामगार आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. नागरिकांनी आणि बचाव पथकाने जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटवत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढले.

या दुर्घटनेत मोतीलाल रामजी मिरगे (वय ५०, रा. मुठाड, ता. भोकरदन) यांचा मृत्यू झाला. तर कृष्णा नामदेव हिरे (वय ३०, रा. दगडवाडी), कृष्णा विठ्ठल शिंदे (वय ४०, रा. वाकडी), फारुख खा शारूख खा (वय ३८, रा. दानापूर) आणि लक्ष्मण गणेश ठोंबरे (वय ३०, रा. सुरंगळी) हे चौघे जखमी झाले आहेत.

जखमी मजुरांना तातडीने भोकरदन येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, आवश्यकतेनुसार काही जखमींना जालना येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, स्लॅब नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बांधकामाची गुणवत्ता आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत असून, दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या