गणेश पगारे
अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात समस्त बौद्ध समाज व अनुसूचित जातीतील विविध समाजघटकांच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने घंटानाद व थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील विविध गावांतील नागरिक, महिला व युवकांनी हातात थाळ्या व घंटा घेऊन जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणाविरोधात निषेध नोंदविला.
आंदोलनादरम्यान "एससी उपवर्गीकरण रद्द करा", "आमच्या मागण्या मान्य करा", "संविधान वाचवा, हक्क वाचवा" अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी थाळ्या वाजवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात एससी उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा, सर्व संबंधितांना दावे व हरकती सादर करण्यासाठी पुरेसा वेळ देऊन न्याय्य सुनावणी द्यावी तसेच अद्ययावत जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारेच निर्णय घ्यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, १८ जून २०२६ पासून सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाची अद्याप शासनाने दखल घेतलेली नसल्याने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात आली आहे. शासनाने लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील टप्प्यात मुंडन आंदोलन, चक्का जाम, शहर बंद, जेल भरो आंदोलन आणि विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.




0 टिप्पण्या